• Since 1988

श्री जगन्नाथ

श्री जगन्नाथ हे जगाचे नाथ आहेत, विश्वाचे स्वामी आहेत. त्यांना महाप्रभू म्हणून देखील ओळखले जाते. भगवान जगन्नाथ हे पुरुषोत्तम, परमात्मा, परमेश्वर आणि परम-ब्रह्म आहेत. त्यांना अनंत नावे आणि रूपांमध्ये आवाहन केले जाते. भगवान जगन्नाथ सर्वव्यापी परमात्मा आहेत आणि सर्वांचे, सर्व-आत्म्याचे उगमस्थान आहेत.

श्री जगन्नाथ उत्पत्तीचे पौराणिक वर्णन ब्रह्मपुराण, नारद पुराण आणि स्कंद पुराणातील उत्कल खंड पुरुषोत्तम महात्म्य मध्ये स्पष्टपणे केले आहे एकदा, श्री वृंदावनात उपस्थित असलेल्या गोपीनी आई रोहिणीला कृष्णाच्या बाललीला कृष्णकथा सांगण्याची विनंती केली व आई रोहिणी त्या गोपीना कृष्णलीला सांगण्यास तयार झाल्या. कृष्ण आणि बलराम यांनी तिथे येऊन लीला ऐकू नये म्हणून सुभद्राला दाराबाहेर पहारा द्यायला सांगितले व ती पहारा देऊ लागली, कारन "भगवंताची कथा तिथे भगवंत येतातच".

रोहिणी आईने कृष्णलीला सुरू केली आणि ती बोलता बोलता सर्वजण तिच्या बोलण्यात, कृष्णलीला ऐकण्यात भाव मग्न झाले व सुभद्रा स्वतः कृष्णलीला ऐकू लागली, इतक्यात कृष्ण आणि बलराम दोघेही तिथे आले आणि हे कोणालाच कळले नाही. भगवान श्रीकृष्ण आणि भाऊ बलराम हे दोघेही आईकडून कृष्णलीला ऐकू लागले, ते ऐकून ते इतके भाव मंत्रमुग्ध झाले की ते प्रेमाने विरघळू लागले, डोळे मोठे पसरु लागले, हात-पाय आकुंचित झाले आणि सम्पूर्ण शरीर विरघळू लागले.

त्याच वेळी, सुभद्रा स्वतः इतकी भाव मंत्रमुग्ध झाली की ती प्रेमात विरघळू लागली. सर्व कृष्णलीला ऐकत होते की इतक्यात नारद मुनी येथे आले. नारदजींनी सर्वांचे भाव बघायला सुरुवात केली. कृष्णाचा तो मनमोहक भाव अवतार पाहून नारदजी म्हणाले प्रभु या भावरूपात तू कधी अवतार घेशील, त्यावेळी कृष्ण म्हणाले की असा अवतार मि घेऊन सर्व जगाला कलियुगाला दर्शन देणार.

त्यानंतर, सत्ययुगात मालव देशावर राजा इंद्रद्युन्य राज्य करत होता, तो विष्णूचा एक महान भक्त होता. एकदा त्याला साधु यात्रेकरूं कडून पुरुषोत्तमची माहिती मिळाली की, नीलाचल निळ्या टेकडीवर, निळ्या नीलमणी पासून बनवलेल्या वासुदेवाच्या प्रतिमेची एक आदिवासी शबर पूजा करत आहे. राजाने विद्यापती याला ती जागा शोधण्यासाठी नियुक्त केले. विद्यापतीणे विश्वबसूच्या मुलीशी लग्न केले आणि मुलीच्या विनंतीमुळे विश्वबसू विद्यापतीला डोळे बांधून त्या ठिकाणी घेऊन गेला, जिथे विद्यापतीने नीलमाधबाचे दिव्य दर्शन घेतले.

नंतर श्रीकृष्ण राजा इंद्रद्युन्यच्या स्वप्नात प्रकट झाले आणि त्याला उपदेश दिला की समुद्राच्या काठावरील झाडाच्या खोडात आपले देवता बनवून नंतर मंदिरात स्थापित कर. श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार राजाने एक वृद्ध सुतार (जे साक्षात विश्वकर्मा होते) यांना पाचारण केले. सुताराने अट घातली की तो बंद खोलीत मूर्ती बनवेल. काही दिवसांनी खोलीतून आवाज येणे बंद झाले, तेव्हा राजाने चिंतेपोटी दरवाजा उघडला. समोर अपूर्ण देवता दिसली व तो सुतार अदृश्य झाला.

राजा दुखी झाला, तेव्हा नारद मुनींनी सांगितले की भगवंताला ह्याच भावरूपात यायचे होते. त्यानंतर राजाने कल्पबटा जवळ एक मंदिर बांधले आणि मूर्ती स्थापित केल्या. या मंदिराच्या गर्भगृहात श्रीकृष्ण, सुभद्रा आणि बलभद्र यांच्या मूर्ती विराजमान आहेत.